मुंबई – कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी ‘धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालतात. माझ्याकडे रॉकेट आहे,’ असे म्हणत शिंदे गटावर टीका केली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर निशाणा साधला. कल्याणध्ये रविवारी भाजप कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीमध्येच मुख्यमंत्री यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले.
काय म्हणाले होते गणपत गायकवाड?
“धनुष्यबाणापेक्षा रॉकेट चालते आणि माझ्याकडे रॉकेट आहे. कल्याण पूर्वच्या जनतेचे हाल करणाऱ्यांचं आता नाव घेत नाही. मात्र, पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा नाव घेऊन सांगेल. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. पण, माझा निधी कोणाच्या कोणाच्या टेबलावर अडवून ठेवला होता, हेही जनतेला सांगणार आहे,” असा इशारा गणपत गायकवाड यांनी दिला.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला निधी आणत मी मंजूऱ्या घेतल्या. पण, श्रेय घेण्यासाठी काहीजण पुढे आले. आपल्याला निवडणुकीत परत त्यांच्याबरोबर फिरायचं असल्याने काही गोष्टी बोलत नाही. एकदा लोकसभेची निवडणूक होऊ द्या. माझ्यावर जेवढे आरोप करायचे आहेत, तेवढे करा. तुमच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे,” असे म्हणत गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. परंतु यावर मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गणपत गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“रॉकेट असले तरी त्याचा वापर गणपतीत होतो. पण, खालच्या कुरबुऱ्या वर टिकत नाहीत. वरती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. भारताला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. ही तात्पुरती कपातली वादळं आहेत. एका क्षणात कपातली वादळं थांबतात. निवडणुकीत भाजप-सेना एकत्र काम करताना दिसतील,” असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट सांगितले.