अकोला – करोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करून अकोट येथील बुधवार वेस वस्तीत दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा दरोडेखोरांना अटक केली आहे. या सहा दरोडेखोरांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
बुधवार वेस अकोट येथे राहणारे अश्विन अमृतलाल सेजपाल (वय 44) हे त्यांचे कुटुंबासह खामगाव येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नाकरिता गेले होते. घरी त्यांचे वृद्ध आई-वडील व मुलगी होते. यावेळी दोन अनोळखी पुरुष व दोन महिला तोंडाला स्कार्फ बांधून आपण करोना लस घेतलेली आहे का याबाबत विचारपूस करून आम्ही सर्वे करत आहोत असे सांगितले.
फिर्यादीचे घरात बळजबरीने घुसून त्यांचे आई वडिलांचे व मुलीचे तोंडात कापसाचा बोळा घातला. त्यांना मारहाण करून घरातील रोख रक्कम व एक मोबाइल असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींना पकडले.