शाहूपुरी पोलिसांची कारवाई; पुणे जिल्ह्यातील दोघांचा समावेश
सातारा – शहरातील भरवस्तीत असणाऱ्या ज्वेलर्सच्या दुकानावर पाच ते सहा दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून दरोडा टाकला होता. याप्रकरणी गणेश सुरेश जाधव, बाबुलाल अंकुश पिटेकर (दोघे रा. खेड, जि. पुणे सध्या रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा), अर्जुन दौलत पवार (रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) या तिघा दरोडेखोरांना तिघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी, सदाशिव पेठेतील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानात सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत सुरक्षा रक्षक बाळकृष्ण गोडसे यांना मारहाण करत दुकानाचे शटर उचकटून सुमारे 28 हजार रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
या फुटेजमधील एका संशयिताची ओळख पटल्यानंतर दरोडेखोर हे शहरातून बाहेर गेले नसावेत, अशी अटकळ बांधत पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने दरोडेखोरांच्या अटकेचे आदेश शाहूपुरी पोलिसांना दिले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विशाल वायकर यांनी सहकाऱ्यांसह अवघ्या तीन दिवसात संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांच्याकडे पुढील चौकशी स.पो.नि. संदीप शितोळे करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप शितोळे, विशाल वायकर, उपनिरीक्षक भोसले, हवालदार हसन तडवी, हिम्मत दबडे, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, स्वप्नील कुंभार, पंकज मोहिते, तुषार पांढरपट्टे, मनोहर वाघमळे यांनी ही कारवाई केली.
विशाल वायकर यांचे कौतुक
दरोड्याच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना तातडीने कारवाईच्या सुचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. दरम्यान, स.पो.नि. वायकर यांच्या पत्नी पुणे येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असल्याने ते पुण्याला गेले होते. मात्र, वरिष्ठांचे आदेश मिळताच त्यांनी तपास कामासाठी पुण्यातून थेट सातारा गाठला आणि संशयितांना अटक करूनच ते पुन्हा पुण्याला रवाना झाले. वायकरांच्या या कृतीमुळे पोलीस दलात त्यांचे कौतुक होत आहे.