शिक्रापूर, (वार्ताहर) : केंदूर (ता. शिरुर) घरात घुसून युवकासह त्याच्या आजी-आजोबाला मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानिफनाथ ठकुजी सुक्रे, गणेश कानिफनाथ सुक्रे, विशाल कानिफनाथ सुक्रे, छाया कानिफनाथ सुक्रे, सारिका कानिफनाथ सुक्रे (सर्व रा. सुक्रेवाडी, केंदूर, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरेश सुदाम पाचुंदकर (वय २५, सुक्रेवाडी, केंदूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संगितले की, दगडू सुक्रे यांना मुलगा नसल्याने त्यांच्या बहिणीचा मुलगा सुरेश पाचुंदकर सुक्रे यांच्या घरी राहून आजी आजोबांचा सांभाळ करीत आहे. शनिवारी (दि. १० फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास घरात शिरले आणि सुरेशला मारहाण करीत शिवीगाळ करून मोबाईलमध्ये शुटींग काढू लागले. सुरेशचा मोबाईल फोडून टाकला. यावेळी सुरेशचे आजी-आजोबा भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार पुढील तपास करीत आहेत.