पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शिक्षकांचे आता मूल्यमापन केले जात आहे. खासगी एजन्सीमार्फत शाळांच्या तपासणीची मोहीम पार पडली आहे. त्यामध्ये अध्यापनासह शाळांच्या दर्जावर अहवाल मागविला आहे. हा अहवाल २६ फेब्रुवारी रोजी उघडला जाणार आहे
मूल्यमापना दरम्यान शाळांना विशिष्ट कोड दिला असून. दोन वर्षांची माहिती भरण्यात घेण्यात आले. शिक्षकाची कामगिरी यासह शाळेचे सामर्थ्य स्त्रोत तपासले आहेत.
शाळांना सात विविध मुद्यांच्या आधारे माहिती देऊन त्याचे मूल्यमापन चार श्रेणीत केले जात आहे. मूल्यमापनात शाळेचे सामर्थ्य स्त्रोत, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यांकन, विद्यार्थी प्रगती, शिक्षकांची कामगिरी, विकास व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, समावेशन, आरोग्य आणि संरक्षण, समाजाचा सहभाग आदी विविध मुद्दे असतील, त्याआधारे गुण दिले जाणार आहेत. खासगी एजन्सीमार्फत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. ४० कर्मचाऱ्यांनी हे मूल्यमापन केले आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून २६ फेब्रुवारीला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात मुख्याध्यापकांसह शिक्षकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मिळालेला अहवाल उघडला जाणार आहे. त्यावर कमी पडत असलेल्या गोष्टींवर योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत. एमफील आणि निवृत्त शिक्षकांमार्फत शिक्षकांच्या अध्यापनाचे मूल्यमापन केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
शिक्षक संघटनांची नापसंती –
चांगले विद्यार्थी घडावेत यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते प्रामाणिकपणे शिकविण्याचे काम करतात. असे असतानाही शिक्षकांच्या अध्यपनाचे मूल्यमापन केले जात आहे. त्यामुळे या उपक्रमावर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तरीही शिक्षण विभागाकडून मूल्यमापनाची प्रकि्रया पूर्ण करण्यात आली.
खासगी एजन्सीमार्फत शाळांच्या तपासणीची मोहीम पार पडली आहे. त्यामध्ये अध्यापनासह शाळांच्या दर्जावर अहवाल मागविला आहे. तो अहवाल २६ फेब्रुवारीला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात उघडला जाइल. त्यामध्ये ज्या कमतरता आहेत, त्यावर योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत. – विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त शिक्षण विभाग.