पिरंगुट -घोटावडे फाटा ते माण या मार्गावर रस्त्याला तडा गेल्याने हा रस्ता खचला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच सुमारे 11 किलोमीटरच्या या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम काम आता निकृष्ट झाले असल्याचे दिसून आले आहे.
मुळशी तालुक्यातून पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून, एक किलोमीटरसाठी तब्बल 2 कोटी 86 लाख इतका निधी होता. एवढा निधी असूनही या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. रस्त्यासाठी वापरलेले दगड मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी तपासणीसाठीही पाठविला होता. त्यानुसार मिळालेल्या अहवालात हे दगड हा ठिसूळ दर्जाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दगडात पाणी शोषून धरण्याची क्षमता जास्त असल्याने रस्ता खचू शकतो, असा उल्लेखही होता.
या रस्त्याचे काम रोडवेज सोल्युशन या कंपनीकडे आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे सपाटीकरणही केले गेले नाही. रस्त्याचे रुंदीकरण केले, मात्र रुंदीकरणासाठी मुरुम व खडी न वापरता मातीने भराव टाकला गेला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला या भागातील नागरिक वैतागले आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असून, अनेक अपघात होत आहेत. रस्त्यावरचे तीव्र वळण आणि उतारही न काढल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून, त्वरीत दुरुस्ती करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच रस्त्याचे अपूर्ण कामही तातडीने पूर्ण करावे. अन्यथा मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
– गंगाराम मातेरे,
तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मुळशी
खचलेला रस्ता हा मुख्य रस्त्याचा भाग नाही. चालू कामाची तपासणी ही स्वतंत्र इंजिनिअरमार्फत केली जाते. त्यांच्या टेस्टिंगमध्ये काही विपरीत आढळून आलेले नाही. रस्त्याचे काम खराब आढळल्यास त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल.
– नकुल रणसिंग,
सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग