पुणे – शहरात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या तब्बल 254 जणांना मागील तीन महिन्यांत करोनाची बाधा झाली आहे. त्यात किराणा दुकानदार, भाजीवाले, दूधवाले, तसेच मेडिकल चालक यांचा समावेश आहे. शहरातील एकूण करोना बाधितांच्या तुलनेत या बाधितांचे प्रमाण सुमारे 1.40 टक्के आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश जणांना “लॉकडाऊन’ काळात बाधा झाली आहे.
शहरात 9 मार्च रोजी करोनाचा पहिला करोनाबाधित आढळला. त्यानंतर महापालिकेने 15 मार्चपासून शहरात टप्प्याटप्प्याने, तर राज्य शासनाने 22 मार्चपासून वर्दळीवर नियंत्रण आणले. त्यानंतर केंद्र शासनानेच 25 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. मात्र, या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांची दुकानेच सुरू होती. त्यात किराणा, दूध, भाजी, मेडिकल यांचा समावेश होता. लॉकडाऊन किती दिवस चालेल, याची नेमकी कल्पना नसल्याने किराणा दुकानांवर मोठी गर्दी होत होती. तर अनेक जण भाजीविक्रीचा व्यवसायही करत होते. त्यातून बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेकांना करोनाची बाधा झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अशा बाधितांची संख्या सुमारे 254 असून व्यवसायामुळे त्यांच्या संपर्कात आलेले सुमारे 200 ते 300 जणही करोनाबाधित झाले आहेत. हे नागरिक बाधित झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून इतरांची करोना चाचणी करण्यात येत आहे.