मंचर – निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील रस्ते खबरदारीची उपाययोजना म्हणून बंद करण्यात आले आहेत. गावात तीन करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हा अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या आदेशानुसार निघोटवाडी टेकडी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
हा क्षेत्र केंद्र मानून बाजूचा 5 किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सरकारच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत निघोटवाडी टेकडी हा परिसर बफर झोन राहणार असल्याने येथे कुणीही गर्दी करू नये. विना मास्क फिरू नये. नियम मोडणाऱ्या अथवा नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील वैद्यकीय सुविधा वगळता इतर सुविधा किराणा दुकानांसह पूर्णपणे बंद राहतील. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकारच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. जिल्हा अधिकारी, पुणे यांनी आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग अधिनियमानुसार निर्बंध घातले आहेत.