“एमएडीसी’ची मंजुरी मिळताच ‘डीपीआर’ तयार होणार
2,832 हेक्टर विमानतळासाठी लागणारी जागा
14,000 कोटी रु. विमानतळासाठी संभाव्य खर्च
पुणे – पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम देण्यात आलेल्या जर्मनीतील “डार्स’ या कंपनीने प्राथमिक अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे (एमएडीसी) सादर केला. त्यामध्ये प्रस्तावित विमानतळाचे रन-वे लोकेशन, टर्मिनल, कार्गो सेंटर आदींसाठीचा डेटा आणि कशा पद्धतीने काम करता येईल, याचा समावेश या अहवालात करण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर अंतिम अहवाल या कंपनीकडून सादर केला जाणार आहे.
या अहवालानुसार, विमानतळासाठी 2 हजार 832 हेक्टर जागेची आवश्यकता असून विमानतळासाठी एकूण 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या गावांतील जागा निश्चित केली आहे. डार्स कंपनीने प्राथमिक आराखडा तयार करताना विमानतळाचा रन-वे, टर्मिनल, कार्गो सेंटर, विमानतळाला जोडणारे पर्यायी रस्ते, तांत्रिकदृष्ट्या विमानतळाची जागा योग्य आहे किंवा कसे या सर्वांचा अभ्यास करण्यात आला. या भूसंपादनासाठी सुमारे तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
तसेच विमानतळ आर्थिकदृष्ट्या परवडणारे असले पाहिजे, त्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, विमानतळाचे काम कशा पद्धतीने, किती दिवसांत पूर्ण होऊ शकते, या सर्व बाबींचा विचार अंतिम आराखड्यात केला जाणार आहे. त्यानंतर हा अंतिम आराखडा सादर केला जाईल.
पुढील महिन्यात बैठक
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर होणार आहे. यामध्ये विमानतळाचा आराखडा, भूसंपादन आणि विमानतळासाठी आर्थिक तरतूद याविषयांवर चर्चा होणार आहे.