पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत दुहेरीत भारताच्या ऋतूजा भोसले आणि ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथ या जोडीने भारताच्या रिया भाटिया व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु या जोडीचा 6-2, 7-5 असा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीचा सामना 1तास 19मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये अव्वल मानांकित ऋतूजा व इमेली यांनी आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भाटिया व बुलगारु यांची सहाव्या गेममध्ये गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये ऋतूजा व इमेली यांनी भाटिया व बुलगारु यांची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. तर, पुढच्याच गेममध्ये भाटिया व बुलगारु यांनी ऋतूजा व इमेलीची सर्व्हिस ब्रेक केली. सामन्यात 5-5 अशी स्थिती असताना अकराव्या गेममध्ये ऋतूजा व इमेली यांनी भाटिया व बुलगारु यांची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 असा जिंकून विजेतेपद पटकावले. गतवर्षी फेब्रुवारी 2020मध्ये ऋतुजा भोसले व इमेली वेबली-स्मिथ या जोडीने जोधपूर येथे यासारख्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. या विजेतेपदाबरोबरच ऋतुजाने दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल 200 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सहसंस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि एमएसएलटीएचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.