मुंबई – आयपीएल 2022 मध्ये, राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान पंचांशी हुज्जत घालणाऱ्या दिल्लीच्या खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे आणि त्यांची संपूर्ण मॅच फी देखील कापण्यात आली आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात प्रशिक्षक आमरे यांची पंचांशी हुज्जत घातली होती. आयपीएल आचारसंहितेअंतर्गत हा दुसऱ्या स्तराचा गुन्हा मानला गेला असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पंतला मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर शार्दुलला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान सहाय्यक प्रशिक्षक अमरे मैदानावर गेले आणि पंचांशी वाद घालू लागले, तर कर्णधार पंतने आपल्या फलंदाजांना परत येण्यास सांगितले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरही पंचाच्या निर्णयावर नाराज होता आणि कर्णधार पंतला पाठिंबा देत होता.
अखेरच्या षटकात घडले नाट्य
दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 36 धावा करायच्या होत्या. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने ओबेद मॅकॉयला गोलंदाजीसाठी बोलावले. या सामन्यात अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक नाट्य घडले. रॉमन पॉवेलने सलग तीन षटकार फटकावले. त्यातील तिसऱ्या चेंडूवर फटकावलेला षटकार नोबॉलवर फटकावल्याचे दिल्ली संघाचे मत होते. मात्र, पंचांनी हा चेंडू नोबॉल दिला नाही. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंत व फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी तिसऱ्या पंचाशी वाद घातला. तसेच पंतने पॉवेल व कुलदीप यादव यांना माघारी बोलवण्याचे नाट्य घडवले. त्यावेळी आमरे यांनी मैदानावर जाऊन पंचांशी हुज्जत घातली. अखेर वरिष्ठ खेळाडू शेन वॉटसनने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमरे व पंत यांना शांत केले व दोन्ही फलंदाजांना उर्वरित चेंडू खेळण्यास सांगितले. पंतनेही त्याला दुजोरा दिला व वाद संपुष्टात आला व सामना सुरू झाला.