कोपरगाव – अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी जुबेर करीम पठाण यास कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर घटना ऑगस्ट 2016 मध्ये घडली होती.
याबाबत माहिती अशी की, पीडित मुलगी अकरावीत शिकत होती. 16 ऑगस्ट 2016 रोजी पीडित मुलगी महाविद्यालयातून घरी न आल्याने तिच्या आईने हरवल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. प्रत्यक्षात सदर आरोपी जुबेर करीम पठाण याने पीडित मुलीस महाविद्यालय सुटल्यानंतर मित्र-मैत्रिणींच्या मदतीने तिला रिक्षात बोलावून घेतले. जुबेरने प्रथम रिक्षा घरी नेली. तेथे त्याच्या आईने त्यास विरोध केला. मात्र त्यास न जुमानता तो पीडितेस रिक्षातून नाशिक मार्गे मुंबईला घेऊन गेला. तेथे मित्राच्या घरी थांबला. 18 ऑगस्ट व 10 ऑगस्ट 2016 रोजी जुबेरने पीडितेवर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेस शिर्डी येथे आणून सोडले.
त्यानंतर घरी आल्यावर पीडितेने घडला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पुरवणी जबाब देऊन जुबर करीम पठाण (रा. तीनचारी, कोकमठाण) याच्या विरोधात मुलीस फूस लावून पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदविला. या प्रकरणी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यात आरोपी जुबेर पठाण हा दोषी असल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.