मावळातील भात शेती धोक्‍यात

बळीराजा चिंतेत ः हाताशी येत असलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीतीकार्यालयात बसूनच पाहणी

मावळ तालुक्‍यात सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे लोंब्यामधील भाताचे दाणेही नासू लागले आहेत. याचा भाताच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर परिणाम होताना दिसत आहे; परंतु कृषी अधिकारी मात्र कार्यालयातच बसून पाहणी करत आहेत आणि थेट शेतात न जाताच उत्पादनात वाढ होईल, असे सांगत असल्याचा आरोप तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केला आहे.

पवनानगर  – मावळ तालुका हा भातपिकासाठी प्रसिद्ध तालुका आहे. मावळातील तांदूळ देश-विदेशात प्रख्यात आहे. मावळाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या भात पिकांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. काही दिवसांतच पीक हाताशी येईल, अशी अपेक्षा असतानाच अचानकच जोर धरलेल्या पावसामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.
भात हेच मावळ तालुक्‍याचे मुख्य पीक असून शेतकऱ्यांची संपूर्ण मदार याच पिकावर आहे. सुरुवातीला सर्वत्र पाऊस चांगला झाल्यामुळे भातपिके चांगली आली होती. परंतु यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे भातशेतीला फटका बसला आहे.

मावळ तालुका हा कोकण किनारपट्टीलगत येत असून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. ज्या शेतकऱ्यांनी लवकर लागवड केली होती. त्या शेतकऱ्यांची भातपिके निसवण्यास(लोंब्या) म्हणजे भाताचा दाणा भरण्यास सुरुवात झाली आहे. पण सध्या महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत असून या पावसाचा फटका तयार होत आलेल्या भातपिकाला बसला आहे.

भातपीक पोटरीवर(दाणा भरु लागला आहे) आले आहे. मात्र या पाऊसामुळे भाताच्या लोंब्यामधील दाणे नासू लागले आहेत. हे दाणे नासल्यामुळे फक्‍तपळंजचं उरले आहे. तसेच लोंब्यादेखील काळ्या पडू लागल्या आहेत. जर हा पाऊस अजून काही दिवस असाच पाऊस सुरु राहिला तर उत्पादनात 50 टक्‍के घट होईल, अशी भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. पवन मावळ परीसरातील कडधे, येळसे, शिवली, कोथुर्णे, काले अशा बऱ्याच गावात दिसून येत आहे

 

कृषी अधिकाऱ्यांनी शेतीत येऊन प्रत्यक्ष सर्व्हे करावा. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करावी. तसेच याबाबतच्या उपाययोजना संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे किंवा कार्यशाळा घ्यावी.

– विष्णू आडकर, शेतकरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)