वडगाव मावळ – देशाची आदर्श पिढी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकच करीत आहेत. अद्ययावत ज्ञानामुळे तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकांचे स्थान मजबूत आहे. विद्यार्थी, शिक्षक व पालक-संवाद वाढविणे आवश्यक आहे. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून त्यांना ज्ञानवंत करणारा शिक्षकच कार्याने आठवणीत राहतात, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी केले. येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेत शिक्षक दिनानिमित्त मंगळवारी (दि. 24) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल असवले पाटील होते.
कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, प्राचार्य डॉ. रवींद्र मिस्त्री, प्राचार्य हिरामण लंघे, प्रा. महादेव सांगळे, प्रा. महादेव वाघमारे, प्रा. अशोक गायकवाड, व बी.एड्. व डी. एड्. व कला, वाणिज्य, बीबीए कॉलेजचे प्राध्यापक, टाकवे बुद्रुक व घोणशेत येथील विद्यालयाचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
या वेळी सृष्टी मराठे, विक्रांत शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. संदीप गाडेकर यांना पीएच.डी. मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सृष्टी मराठे व द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल विक्रांत शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज गायकवाड यांनी केले. प्रा. महादेव वाघमारे यांनी
आभार मानले.