बचाव कार्यात मदत करताना चालला होता वाहून
बारामती – बारामती तालुक्यातील मळद येथे पुरामुळे दुथडी भरुन वाहणाऱ्या कऱ्हा नदीमध्ये बचाव कार्य करताना एक युवक वाहून गेला. पोलिसांसह स्थानिक युवकांनी जीव धोक्यात घालुन या युवकाला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले.
कऱ्हा नदीला गुरुवारी (दि. 26) सकाळ पासून आलेला पूर पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील पुलांवर गर्दी झाली होती. यामध्ये पुराचे छायाचित्र, सेल्फी काढणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खंडोबानगर येथे नदीच्या पुलावर उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी अशीच हुल्लडबाजी करणाऱ्या युवकाला पोलिसी हिसका दाखविला. त्यानंतर पुलावरील हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांनी पोलीसांची धास्ती घेवुन काढता पाय घेतला. मात्र,मदतीसाठी धावुन जाणाऱ्या युवकांची संख्या देखील मोठी होती. मळद येथील नदीच्या पुलावर विनोद रणधीर या 30 वर्षीय युवकाने पुरग्रस्तांना मदतीसाठी सहभाग घेतला होता. बचावकार्य करताना भिंत कोसळल्याने पाय घसरुन तो पुरामध्ये वाहून गेला. यावेळी वाहून जाणाऱ्या युवकाला पाहुन उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. याबाबत माहिती समजल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. उपस्थित असणाऱ्या युवकांनी त्याला वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावली. सतर्कता बाळगत तातडीने विनोदला बाहेर काढले.
विनोद वाहत जावुन 700 ते 800 फूट असणाऱ्या झुडपापर्यंत पोहोचला होता, तोच पाठीमागुन पुरात उड्या घेतलेल्या मुलांनी त्याला गाठले. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. मनोज शिंदे, सुजीत गजरमल, रोहन लोंढे, अनिकेत भोसले, बंटी खोमणे, महेश साबळे, अमर माने आदी युवकांनी धाडस केल्याने विनोदचा जीव बचावला.
बचावकार्यात सहभागी असताना तो घसरुन नदीपात्रात पडला. मात्र, स्थानिक युवकांनी धाडसाने पुराच्या पाण्यात जावुन त्याला वाचवले. त्या मुलांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्या युवकावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
– औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक, बारामती