अशोक सुतार
पिस्त्याची कोंड येथून आम्ही पुढे निघालो. जवळच एक ओढा लागला. या ओढ्यावर स्थानिक गावकऱ्यांनी बांबूचा पूल बांधला आहे, तो पाहण्यासारखा आहे. पाणी जास्त असले तर येथून ओढा ओलांडणे सोयीचे जाते. काही अंतर पुढे कर्नाटक हद्दीत गेल्यानंतर कृष्णपूर हे छोटेसे गाव लागले. येथे वनचौकी आहे. तेथून पुढे गेल्यानंतर पुन्हा मोठमोठी झाडे दिसू लागली आणि भीमगड अभयारण्यात आम्ही प्रवेश केला.
विविध जातीची फुलपाखरे पाहिली. काही रंगीत ठिपके, नक्षी असलेली होती तर काही सफेद रंगांची होती. फुलपाखरांचे वास्तव्य जास्त प्रमाणात आढळले. जंगलात काही अंतर गेल्यानंतर रस्ता अरूंद झाला. आम्हाला खूप दूरवर मोठा डोंगर दिसला. या डोंगराचा आकार कृष्णाच्या मूर्तीसारखा दिसतो, हे विशेष आहे. हा डोंगर म्हणजे पूर्ण दगडाची मोठी शिळा आहे. आकरी कुकरी अशा दोन शिळा आहेत. येथे छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य काही काळ होते. कर्नाटकाच्या हद्दीतून आम्ही पुन्हा मागे फिरलो. झाडांवर माकडे, तर काही ठिकाणी अस्वले असल्यामुळे या जंगलातून सावध प्रवास करावा लागतो.
कृष्णपूरहून आम्ही परतीच्या वाटेवर जात असताना अनेक प्रकारचे वृक्ष पाहिले. आमच्यासोबत वनस्पती अभ्यासक सूर्यकांत गावकर होते. त्यांनी विविध वनस्पती, वृक्षांची माहिती दिली. आमचे लक्ष लाल फुलांनी व फळांनी बहरलेल्या अशोक वृक्षाकडे गेले. या वृक्षाला सुंदर फुले असतात. मात्र, फळे खात नाहीत. अशा कितीतरी वनस्पतींचा अभ्यास करायला मिळाला. दुपारचे बारा वाजले होते. जंगलात असल्यामुळे आम्हाला ऊन जाणवत नव्हते; परंतु फिरून कंटाळा आला होता. म्हादई नदीकाठी आलो. नदीत स्नान केले. थकवा निघून गेला.
नदी ओलांडून आम्ही बसवेश्वर या इतिहासकालीन मंदिराजवळ आलो. तिथे बसवेश्वरांची दीड फुटाची मूर्ती आहे. येथील सर्व मूर्ती सुमारे 1200 वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असा अंदाज आहे. मोठ्या आकाराच्या पिंडी तसेच सातेरी, केबाई, ब्राह्मणी, गजलक्ष्मी अशा मूर्ती येथे आहेत.
आम्ही दर्शन घेतले आणि त्या रम्य परिसरात थोडावेळ थांबलो. येथून जवळच “झाडानी’ नावाचे गाव सव्वाशे वर्षांपूर्वी होते. येथील सर्व लोक एका अनामिक रोगाने मरण पावले. आज कुठल्याही खुणा शिल्लक नाहीत. आम्ही हे ऐकताच सुन्न झालो. नदीवर परत येत असताना नदीकाठी भगवान शंकराच्या अनेक मोठ्या पिंडी दिसल्या. जंगलातून परत गोव्यात येताना आमचे मोबाइल बंद असले तरी आम्हाला म्हादई जंगलात आत्मिक आनंद मिळाला. येथील प्रवास आमच्या कायम स्मरणात राहील. (समाप्त)