चंदीगड – हरियाना विधानसभेतील त्रिशंकु स्थितीत भाजप आणि जननायक जनता पार्टी यांच्यात झालेल्या युतीनंतर तेथे राज्यपालांनी विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले असून उद्या रविवारी त्यांचा शपथविधी होणार आहे.
दुष्यंत चौताला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पार्टीच्या समर्थनाचे पत्र मिळाल्यानंतर भाजपने आज राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा प्रस्ताव सादर केला. दुपारी सव्वा दोन वाजता दिवाळीच्या दिवशीच हा शपथविधी होणार आहे. तत्पुर्वी आज भाजप विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी मनोहरलाल खट्टर यांची नियुक्ती झाली आहे.
90 सदस्यांच्या सभागृहात सरकारला आता एकूण 57 आमदारांचे पाठबळ लाभले आहे. त्यात भाजपच्या 40, जननायक जनता पार्टीच्या 10 आणि सात अपक्षांचा समावेश आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजप आणि जेजेपी पक्षात झालेल्या समझोत्यानुसार जेजेपी पक्षाला उपमुख्यमंत्री पद आणि तीन मंत्रिपदे दिली जाणार आहेत. जेजेपी पक्षाने भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहींर केल्यानंतर येथील सत्ता स्थापनेचा सस्पेंन्स संपुष्ठात आला.
हा पक्षच या राज्यात किंगमेकर ठरला आहे. कॉंग्रेसला तेथे 31 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जननायक जनता पार्टी ज्या पक्षाला पाठिंबा देईल त्या पक्षाच्या सरकार स्थापनेचा मार्ग सुकर होणार होता. जेजेपी पक्षाने भाजपचीच निवड केली. त्यातच भाजपने अन्य सात अपक्षांनाही आपल्या बरोबर घेण्यात यश मिळवले.