पिंपरी, दि. 11 – मुहूर्त पाहूण कोणत्याही शुभ कार्याची किंवा वस्तूची खरेदी केली जाते. दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शहरात सह दुय्यम निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कातून कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये 877 दस्त नोंदणी झाली. तर, ऑक्टोबरमध्ये 682 दस्त नोंदणी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयांना दसरा ते दिवाळी या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. चिंचवड येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 5 कार्यालयात होणाऱ्या दस्त नोंदणीतून सप्टेंबरमध्ये 2 कोटी 22 लाख 65 हजार 677 रुपयांचा तर, ऑक्टोबरमध्ये 15 कोटी 43 लाख 50 हजार 272 रुपयांचा महसूल मिळाला आहे.
गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त पाहून घरखरेदी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. यंदा दसरा आणि दिवाळी ऑक्टोबर महिन्यातच होते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील दस्त नोंदणीतून करोडोंचा महसूल जमा झाला आहे. या दोन्ही महिन्यात सहदुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी विशेषतः सदनिकांच्या करारनाम्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
चिंचवड येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 5 मध्ये झालेल्या दस्त नोंदणीतून कोट्यवधींचा महसूल मिळाला आहे. येथील कार्यालयात सरासरी 20 ते 25 दस्तांची नोंद होत आहे. चिंचवड येथील हवेली क्रमांक 5 कार्यालयात ऑक्टोबर महिन्यत 682 दस्त नोंदविले गेले. तर, सप्टेंबर महिन्यात 877 दस्तांची नोंद झाली असून नोंदणी शुल्कापोटीही करोडोंचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे, अशी माहिती उपनिबंधक ऊर्मिला कणसे यांनी दिली.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 782 दस्त नोंदणी झाली होती. तर, ऑक्टोबर महिन्यात 874 दस्तांची नोंद झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यातील दस्त नोंदणी कमी असली तरी, सप्टेंबर महिन्यात ती जास्त होती.