मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 9 एप्रिलपासून जयश्री पाटील फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.
जयश्री पाटील या मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. जयश्री पाटील यांचे पती ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोर्टात गेल्या तेव्हा त्या पोलीस संरक्षणाशिवाय होत्या. आपले संरक्षण सुरक्षित नाही अशी शंका आल्याने त्या फरार झाल्या.
यानंतर “सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना वॉण्टेड दाखवण्यात आले आहे. जयश्री पाटील यांनीच हे आंदोलन करण्यास सांगितले, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
गावदेवी पोलिसांनी बुधवारी (13 एप्रिल) संध्याकाळी एफआयआरमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून जोडले. त्यानंतर जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून त्या नॉटरिचेबल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत.