नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी मंगळवारीही डिझेल दरवाढीचे सत्र सुरू ठेवले. त्यानुसार, ते इंधन 25 पैशांनी महागले. त्याशिवाय, दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर पेट्रोलच्या दरातही लिटरमागे 20 पैशांची वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता दोन्ही इंधने आणखी महागण्याची चिन्हे आहेत.
सार्वजनिक कंपन्यांनी सुमारे तीन आठवडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कुठला बदल केला नाही. मात्र, 24 सप्टेंबरला प्रथमच डिझेलच्या दरात 20 पैशांची वाढ केली. तेव्हापासून पाच दिवसांत चौथ्यांदा डिझेलच्या दरात वाढ झाली. त्यामध्ये मिळून डिझेल 95 पैशांनी महागले. डिझेल दरवाढीचे सत्र पुन्हा सुरू झाल्यावर पेट्रोल दर जैसे थे ठेवण्यात आला होता. मात्र, मंगळवारी दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली. देशाच्या निम्म्याहून अधिक भागात पेट्रोलचा दर याआधीच 100 रूपयांवर गेला आहे.
देशाच्या तीन राज्यांत डिझेलनेही ती पातळी ओलांडली आहे. भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांच्या किमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनांचे दर तीन वर्षांत प्रथमच प्रतिपिंपामागे 80 डॉलर्स एवढ्या उच्चांकी पातळीपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे भारतात दरवाढीचे सत्र अटळ मानले जात आहे.