नवी दिल्ली, दि. 14 – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या आठवड्यात आज पुन्हा चौथ्यांना दरवाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात 29 पैसे आणि डिझेलच्या दरात 34 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात उच्चांकी वाढ नोंदवली गेली आहे.
अनेक राज्यांमध्ये या आधीच इंधनाच्या दराने शंभर पार केली असून आता उर्वरित राज्यांमध्येही हे दर वेगाने शंभरीच्या जवळ जाताना दिसत आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर शंभर रुपये लिटरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. तेथे आजचा पेट्रोलचा दर 98 रुपये 65 पैसे इतका झाला आहे. तर डिझेलचा दर 90 रुपये 11 पैसे इतका झाला आहे. विविध राज्यांमध्ये व्हॅट आणि स्थानिक दर वेगवेगळे असल्याने तेथील किमती वेगवेगळ्या असतात.
आज राजस्थान आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक दराने व्हॅट आकारला जातो आहे त्यामुळे त्या राज्यांतील पेट्रोलच्या दराने आधीच शंभरी पार केली आहे. राजस्थानातील गंगानगर जिल्हतील पेट्रोलचा दर 103 रुपये 27 पैसे इतका झाला आहे. अलीकडच्या काही काळात पेट्रोलच्या दरात एकूण 22 रुपये 75 पैसे इतकी वाढ झाली असून डिझेलच्या दरात 20 रुपये 66 पैसे इतकी वाढ झाली आहे.