पुणे -जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना बाधित दर अजूनही 9 ते 10 टक्क्यांवर आहे. त्यामुळे निर्बंध कायम आहेत. परंतू, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील निर्बंध शिथिल केल्यानंतर ग्रामीणमध्येही निर्बंध शिथिल केले की काय, अशी परिस्थिती दिसून येते आहे. विशेषत: शहरालगत आणि बाजारपेठा असलेल्या भागात गर्दी दिसून येते.
मागील पंधरा दिवसांत ग्रामीण भागाचा करोना बाधितांचा दर काही प्रमाण कमी झाला असला, तरी निर्बंध हटवण्याइतपत तो खाली आलेला नाही. त्यामुळे येथील व्यवहार सुरळीत सुरू व्हायला प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या ग्रामीण भागाचा बाधित दर हा 9.7 टक्के इतका आहे. यामुळे तिसऱ्या स्तरावरिल निर्बंध लागू आहेत. दुसऱ्या स्तरावर येण्यासाठी 5 टक्क्यांच्या आता बाधितांचा दर आणावा लागणार असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला आणखी कठोर उपाय योजना कराव्या लागणार आहेत.
ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधून पुणे शहरात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. येथील दुकाने उघडली, आता गर्दी वाढू लागली. त्याप्रमाणे ग्रामीण भागांतही सर्व नियम शिथिल झाले, अशा समजातून नागरिक फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाधित दर ज्या वेगाने कमी होणे अपेक्षित आहे, तो होत नसल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगत आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेने तालुकानिहाय करोना चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. तसे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 10 पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या हॉटस्पॉट गावांची संख्या 86 आहे. तर कन्टेन्मेंट झोनची संख्या ही 3,762 आहे. एकट्या हवेली तालुक्यात सर्वाधिक 1,720 कंटेन्मेंट झोन आहेत.
ग्रामीण भागातील बाधितांचा दर कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तालुक्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. हॉटस्पॉट गावांत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. याचे चांगले परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील. बाधितांचा दर कमी होत असून लवकरच तो पाच टक्क्यांच्या खाली येण्याची अपेक्षा आहे.
– आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे