कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ साईबाबा कॉर्नर येथून मोटरसायकल रॅलीचे काढण्यात आली. या मोटरसायकल रॅलीला कोपरगाव शहराच्या नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोपरगाव शहरातील सर्व रस्ते या मोटरसायकल रॅलीने फुलून गेले होते.
कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथून साईबाबांचे दर्शन घेऊन सकाळी मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली. या मोटरसायकल रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले तरुण नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. साईबाबा तपोभूमी येथून दर्शन घेऊन, आण्णाभाऊ साठे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक, शिवाजी रोड, सराफ बाजार, पांडे गल्ली, जब्रेश्वर मंदिर, सावरकर चौक, गांधीनगर रोड, आचारी हॉस्पिटल चौक, संभाजी चौक गोकुळनगरी, टाकळी नाका, गोदावरी खोरे पेट्रोल पंप, एस.एस.जी.एम. कॉलेज चौफुली ते साईबाबा तपोभूमी साईबाबा कॉर्नर कोपरगाव या मार्गावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
मला जे प्रेम दिलं तेच प्रेम आशुतोषला द्या : अशोक काळे
मला जस प्रेम दिलं आणि दहा वर्ष आमदार म्हणुन निवडुन दिलं. तसेच प्रेम आशुतोषला द्या, तो नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लावेल, असे आवाहन माजी आमदार अशोक काळे यांनी मतदार राजाला केले. मतदार संघातील नागरीकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. 40 वर्षात न झालेले कामे मी 10 वर्षात पूर्ण केली. ती सर्व आपल्या डोळ्यासमोर आहे.
मी काही खोट्या पुस्तिका छापलेल्या नाही, अशी टिका काळे यांनी भाजप महायुतीचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्यावर केली. काळे पुढे म्हणाले की, आशुतोष काळे हे नेहमीच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आहेत. दुष्काळ, पाणी, रस्ते, पाटपाणी यासारख्या जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी आंदोलने, मोर्च्याच्या माध्यमातुनही ते जनतेचे समस्यांशी निगडीत असल्याचे काळे म्हणाले.