विकासासाठी हडपसरला मंत्रिपद मिळणार : चंद्रकांत पाटील

आमदार योगेश टिळेकर यांना मंत्रिपद देण्याची महायुतीच्या प्रचारसभेत घोषणा

हडपसर – महाराष्ट्रात भाजप-महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी येथील जनता सत्तेतीलच आमदार निवडून देतील, हडपसरचे विद्यमान आमदार अतिशय हुशार, सहज उपलब्ध होणारे व राज्य सरकार चालवणाऱ्या 100 नेत्यांमध्ये योगेश टिळेकर यांचे नाव येते. मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याने गेल्या पाच वर्षांत मोठा निधी आणून हडपसरचा खुंटलेला विकास सुरु केला आहे. योगेश टिळेकर यांना म्हणजेच हडपसरला मंत्रीपद देणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या प्रचारार्थ हडपसर येथील सभेत पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विकास रासकर, तानाजी लोणकर, नगरसेवक मारुतीआबा तुपे, उज्ज्वला जंगले, संजय घुले, शशिकला वाघमारे, वंदना कोद्रे, समीर तुपे, विराज तुपे, शिवराज घुले, माऊली कुडले, भूषण तुपे व नागरिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज ठाकरे म्हणतात, “मला विरोधी पक्षात बसवा’. शरद पवार खडसेंना म्हणतात “राष्ट्रवादीत या विरोधी पक्षनेता करतो,’ म्हणजे विरोधकांना खात्री झाली आहे महायुतीचेच सरकार येणार आहे. आमदार टिळेकर म्हणाले, ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे पुलाचे राजकारण करुन जनतेस वेठीस धरले, परंतु तो प्रश्‍न मी सोडवला. हडपसरला मेट्रो आणून जनतेचा विश्‍वास सार्थ ठरविला.

आमदार टिळेकरांचे विरोधकांना प्रत्युत्तर
“जनतेने आता ठरवलयं, आपले प्रश्‍न अपमानास्पद वागणूक मिळणाऱ्या वाड्यावर सोडवायचे, की सर्वसामान्यांत मिसळणाऱ्या आमदारांच्या जनता दरबारात? मागील काळात मनसेच्या नगरसेवकाने माझ्यावर केलेले आरोप न्यायालयात व चौकशी अहवालात खोटे ठरले आहेत. त्यामुळे माझा निकाल जनतेच्या न्यायालयात असून जनता मला विजयी करणार आहे,’ असा विश्‍वास योगेश टिळेकर यांनी व्यक्‍त केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.