डॉक्‍टरांच्या देशव्यापी संपास नगरमध्ये प्रतिसाद

सर्व खासगी हॉस्पिटलमधील ओपीडी बंद : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नगर – कोलकाता येथे डॉक्‍टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पुकारलेल्या डॉक्‍टरांच्या देशव्यापी संपाला सोमवारी मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा वाजता या संपाला सुरुवात झाली आहे. नगरमधील सर्व खासगी डॉक्‍टरांनी यात सहभागी होत, हॉस्पिटल मधील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवले आहेत. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणार असल्याची माहिती आय.एम.ए.चे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. शंकर शेळके यांनी दिली.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेचे सर्व सदस्य तसेच शहरातील खाजगी डॉक्‍टरांनी दिल्लीगेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला होता. या मोर्चात नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. शंकर शेळके, सचिव डॉ. अनिल सिंग, डॉ. अमित खराडे, उपाध्यक्ष डॉ. सागर वाघ, डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. निसार शेख, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. महेश वीर, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. विजय पाटील, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. अर्जुन शिरसाठ, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. रजिया निसार, डॉ. कांचन रच्चा, डॉ. सुवर्णा होशिंग, डॉ. सुप्रिया वीर, डॉ.सागर झावरे यांच्यासह डॉक्‍टर्स सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. शेळके म्हणाले, “आयएमए’च्या घोषणेनुसार, सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे 24 तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. देशभरासह महाराष्ट्रातील हजारो डॉक्‍टर या संपात सहभागी झाले आहेत. डॉक्‍टरांवर सातत्याने होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यासह डॉक्‍टरांना सुरक्षा देण्याची संघटनेची मागणी आहे. यासाठी केंद्रीयस्तरावर कायदा करण्यात यावा. महाराष्ट्रात 2010 मध्ये हा कायदा करण्यात आला. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)