सिंगल स्क्रीन थिएटर्सची अखेर दखल

पुणे – राज्यातील एक पडदा सिनेमागृहांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या समितीला महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

जुने एक पडदा सिनेमागृह बंद करून त्या जागी नवीन व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी, ही प्रमुख मागणी संघटनेची आहे. सिनेमा ओनर्स ऍड एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया, या संस्थेचा एक पडदा सिनेमागृहाच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी नुकतीच सह्यादी अतिथीगृह येथे एक बैठक अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एक पडदा सिनेमागृहांच्या मालकांशी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

या समस्या विविध विभागाशी संबंधित असल्याने अर्थराज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल महिन्याच्या आत शासनास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये गृह, महसूल , वित्त विभाग यांचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश असणार आहे. तसेच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याबरोबर असोसिएशन प्रतिनिधींचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.