पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – नागरी क्षेत्रांतील जमिनींचे रेकॉर्ड व उंच इमारतींसाठी जमिनीचे रेकॉर्ड (व्हर्टिकल प्राॅपर्टी कार्ड) तयार करण्याची आवश्यकता आहे, असे मत यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केले.
यशदा येथे राष्ट्रीय शहरी जमीन विषयावर दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या उद्घाटनप्रसंगी चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी केंद्र सरकारचे सहसचिव दीपक अगरवाल, सर्व्हे ऑफ इंडियाचे माजी सर्व्हेअर जनरल लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार, महाराष्ट्राचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशु उपस्थित होते. परिषदेमध्ये विविध राज्यांतील प्रमुख अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
भारतातील फार थोड्या शहरांमध्ये जमिनीचे अद्ययावत रेकॉर्ड व नकाशे अस्तित्वात आहेत. मुख्यतः जमिनींचे मालमत्ता कर रेकॉर्ड अद्ययावत ठेवले जातात. परंतु जमिनींचे रेकॉर्ड मात्र अद्ययावत केले जात नाही. याविषयाकडे या परिषदेमध्ये लक्ष वेधले गेले. तसेच भारतातील जमीन मोजणीच्या इतिहासासह, शहरी भागातील जमीन रेकॉर्ड करण्यातील आव्हानांवर चर्चा करण्यात आली.
गुजरातचे उपसंचालक नाडा यांनी गुजरातमधील शहरांचे सिटी सर्व्हे रेकॉर्ड व उंच इमारतींचे रेकॉर्ड तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे, याचे सादरीकरण केले. याशिवाय केरळ, कर्नाटक, तामीळनाडू या राज्यांनी या विषयासंबंधी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती दिली.