पुणे, – शहरातील नियमभंग करणाऱ्या पब, बार, रेस्टो बार, रूफटॉप हॉटेल आणि क्लब चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. याशिवाय बिअर बार, परमिट रूम, रेस्टॉरंट यांच्यासाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. यासाठी पोलीस आयुक्तांनी सीआरपीसीनुसार १४४ कलम पुढील पंधरा दिवसांसाठी लागू करण्याचे आदेश दिले आहे. यावर नागरिकांकडून हरकती व सूचना आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या हरकती ईमेल किंवा सूचना पोलीस आयुक्तालयात द्याव्यात, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, सीआरपीसी १४४ चा आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये बार, परमिट रूम, रेस्टॉरंट, पब, रुफटफ रेस्टॉरंट यांना नोटीस बजावून मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला, तर संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करण्यात येईल. रूफटॉफ व टेरेस हॉटेल यांना दारूविक्रीची परवानगी नसेल, तर त्यांना ती करता येणार नाही.
तसे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, तसेच रूफटॉफ व टेरेस हॉटेलला परवानगी असली, तरी रात्री दहापर्यंतच म्युझिक व डिजे लावता येईल. जे डिजे कलाकार परदेशातून येऊन सादरीकरण करणार आहेत, त्यांनी पंधरा दिवस आधी पोलीस आयुक्तालयातून परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच बाउन्सर यांचे क्रिमिनल रेकॉर्ड असेल आणि त्यांना कामावर ठेवायचे असेल, तर संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये सिगारेट ओढण्यासाठी स्मोकिंग झोन असणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी सिगारेट ओढता येणार नाही.
दोन डीव्हीआर ठेवण्याची सूचना
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेलचालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या मार्गावर, तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. प्रसाधनगृह वगळून हाॅटेलमधील सर्व भागात सीसीटीव्ही बंधनकारक आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील दोन डीव्हीआर यंत्रे लावणे गरजेचे आहे. पोलिसांनी एक डीव्हीआर यंत्र तपासणीसाठी नेले, तर दुसऱ्या यंत्रात चित्रीकरण साठवले जाईल.
धडक कारवाई
पोलीस आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यांनाही अस्थापना नियम पाळतात की नाही, याची खातरजमा करून कडक अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे अखेर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात सीआरपीसी १४४ नुसार आदेश काढले आहेत. या आदेशामुळे पब आणि रूफटॉप चालकांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे पोलीस इतर यंत्रणांच्या कारवाईची वाट न पाहता धडक कारवाई करणार आहेत.
तर वर्षभराचा तुरुंगवास
सीआरपीसी कलम १४४ म्हणजे फौजदारी दंड संहिता. या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असेही म्हणतात. यानुसार कलम १४४ चे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकतात. याअंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.