आ. काळे ः शहापूर, चांदगव्हाण, सोनारी, लौकीचा समावेश
कोपरगाव – राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली सेवा मिळावी या उद्देशातून महायुती सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीच्या कामाला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदारसंघाच्या विकासाला गती देऊन विकासाबरोबरच शासकीय कार्यालयांचादेखील विकास करण्यावर भर देऊन अनेक शासकीय कार्यालयांना आ. काळे यांनी कोट्यवधींचा निधी दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे.
लौकी, शहापूर, सोनारी, चांदगव्हाण व लौकी या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सरकारच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्या जाव्यात यासाठी ग्रामपंचायत कार्यालयदेखील सर्व सोयी-सुविधांयुक्त असणे तेवढेच गरजेचे आहे. या उद्देशातून आ. काळे यांनी मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे त्या सर्व ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतीसाठी निधी दिला आहे.