आळंदीचे प्रश्‍न सोडवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी

शरद बुट्टे पाटील : आळंदीत अपक्ष उमेदवार देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा

आळंदी – निवडणुकांमध्ये मतदानासाठी आळंदीची लोक हवी आहेत. मग त्यांचे प्रश्‍न कोण सोडविणार? आळंदीचे प्रश्‍न सोडविण्यात आमदार गोरे अपयशी ठरले आहेत, अशी टीका जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केली.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ आळंदी येथे पदयात्रा व भव्य सभा घेण्यात आली. त्यावेळी बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी अपक्ष उमेदवार अतुल देशमुख, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भाऊ महाराज फुरसुंगीकर, चांगदेव शिवेकर, कैलास गाळव, सुशिल सैदाणे, दिलीप मेदगे, संजय घुंडरे पाटील, पांडुरंग ठाकूर, राहुल गवारी, सचिन पाचुंदे, अशोक कांबळे, क्रांती सोमवंशी, गणेश दळवी, भागवत आवटे यांच्यासह आळंदी आणि राजगुरूनगरचे भाजपचे नगरसेवक आळंदी परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पांडुरंग ठाकूर म्हणाले, अपक्ष उमेदवार अतुल देशमुख हा उमेदवार भाजपचा आहे. हकालपट्टीची भाषा शिवसेनेची आहे. अतुल देशमुख भाजपचेच आहेत. भाजपची राज्यात आणि तालुक्‍यातही सत्ता येणार, असे सांगून “आजी-माजी हटाव, खेड तालुका बचाव’चा नारा त्यांनी दिला.

संजय घुंडरे म्हणाले, आजी -माजींचा वाईट अनुभव तालुक्‍याला आला आहे. तालुक्‍यातील तरूण यावेळी इतिहास घडविणार आहे. शरद बुट्टे पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये, असे त्यांनी नमूद केले.

अपक्ष उमेदवार अतुल देशमुख म्हणाले, आजी-माजी आमदारांना सभांना नेते आणि सभेला गर्दीसाठी रोजंदारीने लोक आणावी लागतात, याचाच अर्थ त्यांची निष्क्रियता जनतेसमोर आली आहे. मागच्या 15 वर्षांत यांनी जनतेला काहीच दिले नाही. माजी आमदारांनी तालुक्‍यातील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले.त्याला वैतागून तालुक्‍यात बदल केला. आता आजी आमदार निवडून आणल्यावर त्यांनीही जनतेला काहीच दिले नाही.

खेड तालुक्‍याच्या विकासाचे आमच्याकडे व्हिजन आहे. तालुक्‍यातील एकूण एक समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न असून तालुका पुढे न्यायचा आहे. तालुक्‍यात कामगारांचे प्रश्‍न, बेरोजगारांचे प्रश्‍न आतापर्यंत कोणी सोडवले नाहीत, ते आम्ही सोडविणार आहोत. तालुक्‍यात विविध कंपन्या आल्या कामगारांची मोठी संख्या वाढली असताना त्यांच्यासाठी साधे कामगार भवन नाही. ते आगामी काळात उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना पुनर्वसनसाठी सरकारी गायरान जमिनी देण्यासाठी यापुढील काळात आमचे काम सुरू राहणार आहे.
-अतुल देशमुख, अपक्ष उमेदवार.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)