सुट्ट्यांनी वाढविली उमेदवारांची चिंता

मतदानावर परिणामाच्या भीतीने उमेदवारांची वाढली धास्ती

पिंपरी – प्रचारासाठी जिवाचे रान करणाऱ्या उमेदवारांना मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसत नसल्याने ते आधीच चिंतेत आहेत. त्यात येत्या शनिवार आणि रविवारपासूनच मुलांच्या शालेय सुट्ट्यांना प्रारंभ होत असल्याने आपला मतदार बाहेरगावी जाऊ नये, अशी धास्ती उमेदवारांना वाटत आहे.

सध्या बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे सर्वच पालक मुलांची परीक्षा, त्यांची वेळापत्रके आणि अभ्यास घेण्यात अडकले आहेत. मात्र, यातील बहुतांश शाळांच्या परीक्षा या आठवड्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे मुलांना या आठवड्याच्या शेवटी दिवाळीच्या सुट्ट्यांना सुरुवात होत आहे. काही शाळा तसेच नोकरी, आस्थापनांमध्ये शनिवारी सुट्टी असते. त्यात सोमवारी (दि. 21) मतदान असल्याने त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदला दिवस रविवार असल्याने त्यादिवशी नोकरदारांना तर हक्काची सुट्टी असणार आहे.

आयटीयन्सला शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने त्यांना तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी थोडी सुट्टी वाढवून गावाकडे प्रस्थान केल्यास मतदान कमी होण्याची शक्‍यता उमेदवारांना भयभीत करीत आहे. अर्थात जागरूक मतदार मतदान केल्याशिवाय बाहेर कुठेच जात नाही. मात्र, मतदानाबाबत फारसे उत्साही नसणारे मतदार रविवार, सोमवारच्या सुट्टीचा फायदा घेऊन शहराबाहेर गेल्यास मात्र मतदानाचा टक्का घसरण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या उघड प्रचाराला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराचा वेग वाढविताना मतदान जनजागृतीवरही उमेदवारांनी भर दिल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील विविध पक्षांतील नेते, कार्यकर्ते आपापल्या परीने मतदारांनी मतदान करावे, यासाठी आवाहन करत आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)