राजगुरूनगर -खेड तालुक्यातील पाच गावातील करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 73 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आरोग्य दूत आणि प्रशासनाच्या अथक प्रयत्नांना यश आल्याने तालुका करोना मुक्तिकडे वाटचाल सुरु झाली आहे.
खेड तालुक्यात 15 मे रोजी पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण राजगुरूनगर शहराजवळील राक्षेवाडीत सापडला होता. या रुग्णासह घरातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर झित्राईमळा, आंबेठाण, वडगाव पाटोळे, पापळवाडी, कुरकुंडी, कडूस, पाईट, बुरसेवाडी, वेताळे, वाजवणे, वाशेरे, येलवाडी ही सर्व गावे मिळून 29 मेपर्यंत 19 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले.
सर्व रुग्णावर पुणे येथे उपचार सुरु असुन त्यांची प्रक्रुती धोक्याबाहेर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत सापडलेले करोनाबाधित हे मुंबईतून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होते. सध्या 19 करोनाबाधित रुग्णांच्या संबंधित कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या एकूण 73 जणांना म्हाळुंगे येथील म्हाडा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्वांचे स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत.
13 जण संशयित
भोसे, ढमालेशिवार, वासुली आदि भागातील करोना संशयित 13 जणांना नव्याने कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली.
करोना संशयितांना कमीत कमी 14 दिवस होम क्वारंटाइन राहिले पाहिजे. संशयित रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी स्थानिक प्रशासनाने घालुन दिलेल्या अटी आणि नियमांचे उल्लघंन केल्यास अशा व्यक्तिवर गुन्हे दाखल करुन राजगुरूनगर येथे उभारण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल.
-संजय तेली, प्रांत अधिकारी खेड