लोणी काळभोर -हवेली तालुक्यातील एका करोना बाधित महिलेवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्या अगोदर व उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 45 पैकी 28 जणांचे करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. यामध्ये महिलेवर उपचार करणारे डॉक्टर व काही नर्सेसचा समावेश आहे.
निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये बाधित महिलेच्या संपर्कात आलेले तिचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर तसेच इतर अशा 28 जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने, आरोग्य विभागासह लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व उरुळी कांचन या तीन ग्रामपंचायतींचे प्रशासन व वरील गावातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पूर्व हवेलीतील एक महिला शुक्रवारी (दि. 17) लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती.
यावेळी तिला करोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच, संबंधित महिलेवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालय प्रशासनाने संबंधित महिलेला तात्काळ पुढील उपचारासाठी पुण्यातील नायडू रुग्णालयात पाठवले होते. त्यानंतर तिचेवर ऊपचार करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्ड इन्चार्ज, तंत्रज्ञ व पेशंट केअर अशा एकून 38 जणांना रुग्णालयातील एका मजल्यावर क्वारंटाइन करण्यात आले आहे.