खेड तालुका शिवसेनेची मागणी : नायब तहसीलदारांना निवेदन सुपूर्द
राजगुरूनगर – महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अहवाल मिळण्याची मागणी खेड तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन नुकतेच नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना देण्यात आले. खेड तालुक्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत किती शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेत गाव निहाय किती शेतकरी आहेत.
त्यांना किती लाभ मिळणार आहे, याबाबत अद्यापही माहिती उपलब्ध नसल्याने या योजनेचे खरे लाभार्थी किती याबाबत माहिती नसल्याने व तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी कर्जमाफीबाबतचा अहवाल मिळावा, अशी मागणी खेड तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन नुकतेच खेडचे नायब तहसीलदार राजेश कानसकर यांना देण्यात आले. यावेळी खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योती अरगडे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य मच्छिंद्र गावडे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, विभागप्रमुख दत्ता भांबुरे, दिलीप तापकीर, विजया शिंदे, किरण गवारे, सुनील टाकळकर, विजय शिंदे, बाळू येवले, श्रीनाथ लांडे, केशव अरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.