कराडकर मठाच्या अधिपतींचा खून

पंढरपूर येथील घटना; माजी मठाधिपती बाजीरावमामांना अटक

कराड – येथील कराडकर मठाच्या मठाधिपती पदाच्या वादातून ह. भ. प. जयवंतबुवा पिसाळ यांची मंगळवारी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या याच मठाचे माजी मठाधिपती ह. भ. प. बाजीरावमामा कराडकर यांनी केल्याची माहिती पुढे आली असून पोलिसांनी कराडकरला अटक केली आहे. गेल्या दीड वर्षापासून हा वाद सुरू होता. मंगळवारी हा वाद विकोपाला जाऊन अखेर पिसाळ यांना आपला जीव गमवावा लागला.

याबाबत पंढरपूर पोलिसांनी सांगितले की, कराड येथील मारुतीबुवा कराडकर मठामध्ये गेल्या काही वर्षापासून मठाधिपती पदावरून वाद सुरू आहे. ट्रस्टी व बाजीरावमामा यांच्यातील हा वाद न्यायालयापर्यंत गेला आहे. मागील वर्षी मठाधिपतीपदाचा वाद अधिक वाढला. यातून एप्रिलमध्ये बाजीराव मामाने मारुती बुवा मठाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने यांच्या डोक्‍यात विणा घालून त्यांना गंभीर जखमी केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली.

त्यानंतर बाजीरावमामा याला पोलिसांनी अटक करून तीन महिने तुरुंगात ठेवले होते. अनिलनगर परिसरातील कराडकर महाराजांच्या मठात जयवंत बुवा पिसाळ (वय 33, लवंगमाची, ता. वाळवा, जि. सांगली) आणि बाजीराव बुवा कराडकर (वय 34, कोडोली, ता. कराड ) यांच्यामध्ये मठाधिपती होण्यावरुन वाद होता. हे दोघे काल एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये आले होते.

मंगळवारी दुपारी पुन्हा “मठाधिपती तू का मी,’ यावरून वाद सुरु झाला. त्यातून बाजीरावमामांनी जयवंत महाराजांच्या अंगावर चाकूने हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस मठामध्ये दाखल झाले आणि बाजीरावबुवास घटनास्थळी अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here