मेढा : करोना विषाणूने जावळी तालुक्यातही आता प्रवेश केल्याचे समोर आले आहे. जावळी तालुक्यातील निझरे गावातील एका 54 वर्षीय रुग्णाचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व तहसीलदार शरद पाटील यांनी तातडीने निझरे येथे जाऊन संपूर्ण गाव सील केले आहे. परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण निझरे गाव क्वारंटाइन करण्यात आले आहे.
संबंधित रुग्णाच्या कुटुंबासह त्याच्या संपर्कात आलेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य विभागाकडून तातडीने तपासणी करण्यात येत आहे. जावळी तालुक्यात करोनाबाधित रुग्ण सापडल्यने आरोग्य विभाग व प्रशासन सतर्क झाले आहे. करोनाचा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. संबंधित करोनाबाधिताच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत, याचा शोध सुरू आहे.
मुंबईतील वाळकेश्वर येथून निझरे, ता. जावळी येथे आलेल्या 54 वर्षीय टॅक्सीचालकाला काल (दि. 4) करोना संशयित म्हणून सातारा येथे जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा टॅक्सीचालक दहा दिवसांपूर्वी मुंबईहून निझरे येथे आला होता.जावळी तालुक्यात करोनाचा पहिलाच रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. करोनाबाधिताचे कुटुंब व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागाने तातडीने तपासणी सुरू केली आहे.
करोनाबाधिताचा मेढा बाजारपेठेतही वावर?
निझरे येथील टॅक्सीचालकाचा करोनाचा आवहाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाकडून गावातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. या करोनाबाधिताबाबत प्रशासनाने अधिक माहिती घेतली असता, त्याचा मेढा बाजारपेठेतही वावर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित करोनाबाधित एका प्राथमिक आयोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, काही खासगी डॉक्टर व किराणा माल दुकानदारांच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या संदर्भात चौकशी करून संबंधित दुकानदार, डॉक्टरांनाही “होम क्वारंटाइन’चे आदेश दिले आहेत.