नवी दिल्ली – देशातील कोविडचा प्रसार आणि त्याचे व्यवस्थापन या संबंधात संसदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत असलेल्या स्थायी समितीने आपला अहवाल राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांना सादर केला आहे.
समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव हे या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या अहवालात नमूद केले आहे की कोविडकाळात सरकारी रूग्णालयांमधील बेड्स अत्यंत अपुरे पडले. त्यामुळे अनेकांना खासगी रूग्णालयांत आश्रय घ्यावा लागला.
त्यांनी अव्वाच्यासव्वा दर लाऊन रूग्णांकडून जादा पैसे उकळले. तेथील बिलांच्या संबंधात योग्य प्रकारे आधीच नियंत्रण आणले असते तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते असे निरीक्षणही या समितीने नोंदवले आहे. आरोग्यावर सरकारकडून केली जाणारी आर्थिक तरतूद अत्यंत अपुरी असून यापुढील काळात ती वाढवण्याची गरजही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
देशाची लोकसंख्या 130 कोटींपेक्षा अधिक झाली असतानाही आरोग्य सुविधांच्या संबंधात अत्यंत अपुरी तरतूद असणे अनेक समस्यांचे कारण ठरत आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे. कोविड सारख्या आपत्तींना तोंड देण्यात आपल्याला त्यामुळेच अधिक अडचण आली असाही या समितीचा निष्कर्ष आहे. देशातील आरोग्य सेवेवर जीडीपीच्या किमान अडीच टक्के इतका खर्च करणे आवश्यक आहे असेही या समितीने म्हटले आहे.