“रेपो’त पाव टक्‍का कपात होईल !

अर्थमंत्रालयाचे सल्लागार अरविंद विरमणी यांचा आशावाद

नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेला चालना मिळावी याकरिता रिझर्व्ह बॅंक आपल्या मुख्य व्याजदरात म्हणजे रेपो दरात पाव टक्‍का कपात करेल, अशी अशा काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

त्यात अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद विरमणी यांचा समावेश आहे. भारतातील व्याजदर जगातील व्याजदराच्या तुलनेत उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याबरोबरच भांडवल सुलभता वाढविण्याची गरज आहे असे विरमणी यांनी सांगितले. ते म्हणाले की, उद्योगांच्या उत्पादकतेत घट झालेली आहे. त्याचा परिणाम रोजगारनिर्मितीवरही झाला आहे. यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी व्याजदर कपातीची गरज आहे.

इंदिरा गांधी विकास आणि संशोधन संस्थेच्या अर्थतज्ज्ञ अशिमा गोयल, कोटक महिंद्रा बॅंकेच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज, बॅंक ऑफ अमेरिकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंद्रनील सेनगुप्ता इत्यादींनी या विषयावरील चर्चासत्रात भाग घेतला. याअगोदरच्या पतधोरणात ही रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात पाव टक्‍का कपात केली होती. मात्र दरम्यानच्या काळात महागाई फारशी वाढलेली नाही. त्यामुळे या वर्षात आणखी किमान एका व्याजदर कपातीसाठी वाव असल्याचे त्यांना वाटते. देशांतर्गत परिस्थिती व्याजदर कपातीस पूरक आहे. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्हनेही व्याजदर कमी पातळीवर ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारताला व्याजदर कपात करण्यास वाव असल्याचे या अर्थतज्ज्ञांना वाटते.

गेल्या तीन वर्षापासून भारतातील खासगी गुंतवणूक अधिक व्याजदरामुळे कमी झाली आहे. त्याचबरोबर बॅंकांनी कर्ज वितरणापेक्षा कर्ज वसुलीकडे अधिक लक्ष दिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे काहींनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.