अर्थव्यवस्थेवरील आभाळ फाटले; विकास दर केवळ 3.1 टक्‍के

खरी भीती पुढे

नवी दिल्ली: लॉकडाऊन सुरू होण्याअगोदरच्या जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीतील विकास दर केवळ 3.1 टक्के नोंदला गेला आहे. हा दहा वर्षातील नीचांक आहे. मार्च महिन्याच्या शेवटी लॉक डाऊन सुरू झाले. त्यामुळे एप्रिल ते जून या तिमाहीतील विकास दर प्रचंड कोसळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

जानेवारी ते मार्च या तिमाहीतील मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढण्याऐवजी 1.4 टक्‍क्‍यांनी (म्हणजे उणे 1.4 टक्‍के) कमी झाली आहे. बांधकाम क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.2 टक्के मोजली गेली आहे. मात्र कृषी क्षेत्राची उत्पादकता 5.9 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्या माहितीच्या आधारावर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यात आणखी घट होण्याची शक्‍यता खुली आहे.

एप्रिल मध्ये मॅन्युफॅक्‍चचरिंग क्षेत्रात पिछाडीवर

शुक्रवारी एप्रिल महिन्याची मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता उणे 38.10 टक्के इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. एप्रिल महिन्यात मॅन्यूफॅक्‍चरींग क्षेत्रातील कोळशाची उत्पादकता उणे 15.5 टक्के, क्रुड तेलाची उत्पादकता उणे 6.4 टक्के, नैसर्गिक वायू क्षेत्राची उत्पादकता उणे 19.9 टक्के, तेल शुद्धीकरण क्षेत्राची उत्पादकता उणे 24.2 टक्के, खत क्षेत्राची उत्पादकता उणे 4.5%, पोलाद क्षेत्राची उत्पादकता उणे 83.9 टक्के, सिमेंट क्षेत्राची उत्पादकता उणे 86 टक्के तर वीज क्षेत्राची उत्पादकता उणे 22.8 टक्के नोंदली गेली आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवरील आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यातील उत्पादकतेवरही असाच परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

पहिल्या वर्षी केंद्र सरकार नापास

2019-20 या आर्थिक वर्षाचा विकासदर केवळ 4.2 टक्के इतका मोजला गेला आहे. दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतरचे मोदी सरकारचे हे पहिले वर्ष आहे. पहिल्या वर्षातील विकास दर 11 वर्षाच्या नीचांकावर गेला आहे. आता दुसरे वर्ष सुरू झाले असून करोना व्हायरसमुळे या वर्षाचा विकास दर तर शून्य टक्‍क्‍यांच्या खाली जाणार आहे. त्यामुळे विकास दराच्या परीक्षेत पहिल्या वर्षे मोदी सरकार नापास झाले आहे. दुसऱ्या वर्षी त्यापेक्षा खराब परिस्थिती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अगोदर भारत जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे समजले जात होते. 2018-19 या वर्षात भारताचा विकास दर 6.1 टक्‍के होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.