वाघोली (पुणे) – दुरवस्था झालेल्या वाघोली-केसनंद रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे संघटक व माजी उपसरपंच संदीप सातव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) केली आहे. आठ दिवसांत दुरुस्ती केली नाही तर 11 जानेवारीला पीडब्ल्यूडी कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा सातव यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाघोली-केसनंद रोडची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे. हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना, महिलांना या रस्त्यावर वाहन चालविणे कठीण झाले असताना रस्त्यावर दुचाकी चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा रस्ता दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करूनदेखील जाणीपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निधी मंजूर झाला आहे.
लवकरच रस्त्याचे काम चालू होईल, असे अनेक वेळा आश्वासन देण्यात आले; परंतु प्रत्यक्षात काम चालू झाले नाही. आठ दिवसांत वाघोली-केसनंद रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू केले नाही तर 11 जानेवारीला पीडब्ल्यूडी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.