पाटणा – बिहारमधील एका भाजप उमेदवाराच्या पराभवाची निश्चिती केल्याचा दावा एका जेडीयू आमदाराने केला. त्यामुळे त्या राज्यातील भाजप आणि जेडीयू या सत्तारूढ मित्रपक्षांमध्ये संशयाची ठिगणी पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही गोची होणार आहे.
बिहारमध्ये सरलेल्या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा संदर्भ देणारी जेडीयूचे आमदार नरेंद्रकुमार नीरज उर्फ गोपाल मंडल यांची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. ती क्लिप राजकीय खळबळ उडवणारी ठरली आहे.
भागलपूर जिल्ह्यातील गोपालपूर मतदारसंघातून मंडल तिसऱ्यांदा विजयी झाले. तर लगतच्या मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष रोहित पांड्ये पराभूत झाले. त्यांचा पराभव माझ्यामुळेच झाल्याचे मंडल त्या क्लिपमध्ये म्हणताना दिसतात.
लगतच्या मतदारसंघांमध्ये मी ज्यांचा प्रचार केला; ते विजयी झाले. मात्र, अतिशय घमेंडी असणाऱ्या पांड्ये यांचा प्रचार मी केला नाही. त्यामुळे ते पराभूत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका प्रचार सभेत मी आणि पांड्ये व्यासपीठावर होतो.
मात्र, पांड्ये यांनी मला साधा नमस्कारही केला नाही, असे म्हणत मंडल यांनी पांड्ये यांचा जातीवाचक उल्लेखही केला. त्यावरून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. मंडल यांचे मानसिक संतुलन ढळले असल्याचे भाजपने म्हटले.