सातारा – सातारा शहराची झालेली हद्दवाढ व 13 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुका, यामुळे यंदाच्या स्वीकृत नगरसेवक निवडीला बरेच राजकीय संदर्भ आहेत. हद्दवाढीत शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात सातारा विकास आघाडीने बांधणी सुरू केली आहे. खासदार गटाने पालिका निवडणुकीची रंगीत तालीम सुरू केल्याची चर्चा आहे. या हालचालींवर आमदार गटाचे लक्ष असून सध्या “वेट अँड वॉच’, अशी त्यांची भूमिका आहे.
गेल्या सहा महिन्यापासून करोनाचे थैमान सुरू असल्याने सातारा शहराच्या विकासावर गंभीर परिणाम झाला आहे. पालिकेचे घटलेले उत्पन्न, रखडलेली विकासकामे, आरोग्य निरीक्षकांच्या लाच प्रकरणामुळे लागलेला बट्टा, घटलेली वसुली आणि हद्दवाढीनंतर शहरात नव्याने येणाऱ्या भागाच्या विकासाचा आराखडा, या गोष्टींचा विचार करून सातारा विकास आघाडीला स्वीकृत नगरसेवक निवडीत सावध पावले टाकावी लागणार आहेत.
उपनगराध्यक्षपदी किशोर शिंदे यांच्या निवडीला चौदा महिने झाल्याने या पदावरील बदलासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. करंजे व लगतच्या त्रिशंकू भागात नेतृत्व मजबूत करण्याच्या उद्देशाने उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवक मनोज शेंडे यांचे नाव पुढे आले आहे. करंजे भागावर उदयनराजे यांची असलेली मर्जी लपून राहिलेली नाही.
सातारा विकास आघाडीच्या वाट्याची दोन स्वीकृत नगरसेवकपदे असून एका पदावर आघाडीचे “चाणक्य’ म्हटले जाणारे ऍड. दत्ता बनकर व दुसऱ्या पदावर प्रशांत आहेरराव सध्या आहेत. त्यातील बनकरांचे पद “पर्मनंट’ मानले जात असल्याने आहेररावांच्या जागी अन्य कोणाची तरी वर्णी लागेल.
अर्थात याबाबत उदयनराजे यांनी अद्याप कोणताही संकेत दिलेला नाहीत; परंतु मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपचे रचीकृत नगरसेवक विकास गोसावी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी विठ्ठल बलशेटवार, आप्पा कोरे, सुनील कोळेकर यांच्या नावांची चर्चा आहे. नगर विकास आघाडीकडून अविनाश कदम यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते.
राष्ट्रवादीसुद्धा होणार सक्रिय
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस, असे राजकीय चित्र असण्याची शक्यता आहे. खेड ग्रामपंचायतीचा एक तृतीयांश भाग सातारा पालिका हद्दीत आल्याने आ. शशिकांत शिंदे यांचा तेथील गट सक्रिय झाला आहे. खेड ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात उदयनराजे, शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदे यांचे स्वतंत्र गट आहेत. त्यामुळे तेथील राजकीय जुगलबंदी पालिका निवडणुकीत रंगतदार होणार आहे. दोन्ही राजांवर नाराज असलेल्यांची संख्याही मोठी आहे. त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून होतील. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी सातारकरांना चूक दुरुस्त करण्याची साद घातली होती. त्याची पुनरावृत्ती सातारा पालिका निवडणुकीत थोरले पवार करणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
संजय पाटील यांच्या नावाची चर्चा
शाहूपुरीचा समावेश साताऱ्यात झाल्याने खा. उदयनराजे यांचे तेथील कट्टर समर्थक संजय पाटील यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदी त्यांना संधी देण्याची गळ उदयनराजेंना घातली जात आहे. संजय पाटील हे शाहूपुरीतील आक्रमक नेतृत्व आहे. त्यांना संधी दिल्यास आगामी पालिका निवडणुकीत साविआला तेथे राजकीय लाभ होऊ शकतो.