लोणी काळभोर -हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती, कोंढवे धावडे, पेरणे-लोणीकंद व पिसोळी या सहा गावांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही करोनाचा रुग्ण न आढळल्याने येथील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) काढून टाकण्यात आले आहेत, असा आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिला आहे.
करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार लोणी काळभोर गावठाण-विश्वराज हॉस्पिटल परिसर, उरुळी कांचन-आश्रम रोड, कदमवाकवस्ती परिसर, कोंढवे धावडे- ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, पेरणे-लोणीकंद गावठाण व पिसोळी-अंतुलेनगर हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता. नियमानुसार या भागात गेल्या 28 दिवसांत एकही नवीन करोनाचा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे सहा गावांमध्ये जाहीर केलेले प्रतिबंधित क्षेत्र रद्द केले आहेत. या संदर्भातील आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी बारवकर यांनी काढला आहे.
आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर यांनी पूर्व हवेलीमधील कटेंन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) हटविण्याची मागणी तहसीलदार सुनील कोळी व हवेली पंचायत समितीचे गटविकास विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे केली होती. मागील महिनाभरात उरुळी कांचन व कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीमधील लोणीकंद गावठाण, लोणी काळभोर गावठाण, विश्वराज हॉस्पिटल परिसर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन भागात करोनाचे रुग्ण आढळून आल्याने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता.
मात्र, या भागातील रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने व प्रतिबंधीत क्षेत्राची मुदत संपल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व हवेलीमधील लोणीकंद गावठाण, लोणी काळभोर गावठाण, विश्वराज हॉस्पिटल परिसर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन भाग कटेंन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) मधून बुधवार (दि.20) पासून वगळले आहेत. यामुळे पूर्व हवेलीत उद्यापासून सकाळी सात ते रात्री सात यादरम्यान व्यवसाय सुरू करता येणार आहेत. दरम्यान, कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) हटवल्याने पूर्व हवेलीमधील व्यवहार सुरू होणार असले तरी, सलून, हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे व्यवसाय बंदच राहणार आहेत.
लोणीकाळभोरच्या अर्थव्यवहारावर आज फैसला
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्यासमवेत उद्या सकाळी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांची बैठक होणार आहे. बैठकीत लोणी काळभोर गावातील व्यवहार पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन महिने बंद असलेले गावातील व्यवहार मर्यादित स्वरूपात व नियंत्रित वेळेत सुरू होतील, अशी माहिती ग्रामविकास आधिकारी डी. के. पवार यांनी दिली.