- राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, वडगाव पोलीस यांची संयुक्त कारवाई
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी फुटणार
वडगाव मावळ – वडगाव ते तळेगाव दाभाडे फाटा चौकाच्या दुतर्फा हॉटेल, गॅरेज व टपऱ्या टाकून अतिक्रमण करण्यात आले. या अतिक्रमणामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातात वाढते प्रमाण दूर करण्यासाठी मंगळवारी (दि. 18) सकाळपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व वडगाव पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये जेसीबी मशिनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.
वडगाव ते तळेगाव दाभाडे फाटा चौकाच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मुंबई-पुणे ते चाकण राष्ट्रीय महामार्ग या मार्गावरील औद्योगिक क्षेत्रातील व अन्य वाहतूक 24 तास सुरू असते. या चौकात वाहतुकीची तसेच नागरिकांची वर्दळ असल्याने मार्गाच्या 40 मीटरच्या हद्दीत 22 जणांनी हॉटेल, गॅरेज व टपऱ्या टाकून अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणामुळे अवजड वाहनचालक त्यांची वाहने रस्त्यात उभी करून चहा, नाष्टा करण्यासाठी थांबतात.
या वाहनांमुळे नागरिकांना चौकातून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अनेकदा दुचाकीस्वारांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. अतिक्रमण कारवाई केल्याने चौक प्रशस्त झाला असल्याने वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यापूर्वीही चौकात अनेकदा अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमणे होतात. अतिक्रमण हटविल्यामुळे या चौकाने मोकळा श्वास घेतल्याने वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या अतिक्रमण कारवाईच्या प्रसंगी उपअभियंता प्रेरणा कोटकर, नायब तहसीलदार राजेंद्र शिंदकर, आयआरबी अभियंता उत्तम चौघुले, पोलीस कर्मचारी संदीप चौधरी, महादेव म्हेत्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, अतिक्रमण काढल्यानंतर रिकाम्या जागेत वृक्षारोपण करण्याची मागणी उपस्थित नागरिकांनी केली.