जान्हवी कपूरचा “गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमामध्ये वायुदलाची छबी बिघडवण्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. वायुदलानेच या सिनेमातील कंटेन्टवर आक्षेप घेणारे पत्र सेन्सॉर बोर्डाला पाठवले आहे. एवढेच नव्हे तर विंग कमांडर गुंजन सक्सेना बरोबर काम केलेल्या रिटायर्ड विंग कमांडर नम्रता चंडीनेही या सिनेमातील कंटेंन्टवरून करण जोहरवर
आगपाखड केली आहे. करण जोहर या सिनेमातून चक्क असत्य पसरवत आहे, असे नम्रताने म्हटले आहे.
जान्हवी कपूरने अशा सिनेमामध्ये काम करू नये, असा सल्लाही तिने दिला आहे. मी स्वतः एअर फोर्समध्ये हेलिकॉप्टर पायलट होते. सिनेमामध्ये जसे दाखवले गेले आहे, तसे शोषण किंवा भेदभावाचा कधीही सामना मला करावा लागला नाही. युनिफॉर्मवाले पुरुष सज्जन असतात आणि प्रोफेशनलही असतात, असाच माझा अनुभव आहे.
मुलींसाठी चेंजिंग रूम, लेडीज टॉयलेट नसल्याने सुरुवातीच्या काळात मलाही काही समस्या आल्या होत्या. मात्र पुरुष अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी सुविधा करून दिल्या होत्या. 15 वर्षाच्या करिअरमध्ये मला कधीही वाईट अनुभव आला नाही, असे नम्रता चंडीने म्हटले आहे. पहिली फायटर पायलट गुंजन सक्सेना नव्हती, तर श्री विद्या राजन होत्या असेही तिने सांगितले.