तळेगावातील पहिल्या महिला रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
तळेगाव स्टेशन – तळेगावातील पहिल्या करोनाबाधित महिला परिचारिकेचा फॉलोअप कोविड-19 चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच माळवाडीतील दुसऱ्या करोनाबाधित परिचारिकेच्या संपर्कातील पती आणि दोन्ही मुलांचे चाचणी अहवालही मंगळवारी (ता. 12) रात्री निगेटिव्ह आल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली. त्यामुळे माळवाडीसह तळेगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
तळेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असला तरी कुठलीही भौतिक लक्षणे न आढळलेल्या मावळातील पहिल्या महिला रुग्णाला 7 मे रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या परिचारिकेने कुठल्याही विशेष उपचारांशिवाय प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीने करोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या तरी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत एकही करोनाबाधित रुग्ण नाही.
करोना प्रतिबंधासाठी तळेगावातील नागरिकांसह प्रशासनाकडून पुरेसी खबरदारी घेतली जात असली तरी, चोरीछुपे बाहेरील प्रतिबंधित क्षेत्रातून तळेगावात ये-जा करणाऱ्यांमुळे संसर्गाच्या धोक्याची टांगती तलवार कायम आहे.