पारनेर -पोलीस कोठडी मिळालेल्या एका आरोपीस पारनेर पोलिसांनी उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात आणले होते. उपचारानंतर त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या हाताल हिसका देत पलायन केले. हा प्रकार मंगळवारी (दि.12) रात्री पावणेनऊच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण ऊर्फ मिठू पोपट गायकवाड (वय 26, रा. तराळवाडी, ता. पारनेर) याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री आरोपी गायकवाड याने छातीत त्रास होत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यास उपचारासाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे उपचार घेतल्यानंतर रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलीस कर्मचारी त्याला घेऊन पोलीस ठाण्याकडे निघाले असता, आरोपी गायकवाड याने पोलिसांच्या हाताला झटका देत पलायन केले. त्यामुळे पोलीसांची एकच धावपळ उडाली. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पसार झाला. पोलिसांनी रात्रभर त्यासा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार श्रीकृष्णराव बोत्रे यांनी फिर्याद दिली आहे.