नवी दिल्ली – महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल या दैंनदिन वापरातील वस्तूंच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. मात्र आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारकडे किरीट पारिख समितीने सीएनजीवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, किरीट पारेख समितीच्या गॅसच्या किमतींबाबतच्या शिफारशी मंजूर करण्यता आल्या आहेत. समितीने नैसर्गिक वायूला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय होईपर्यंत सरकारने सीएनजीवर कमी उत्पादन शुल्क आकारावे, अशी शिफारस केली होती.
या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे देशातील पीएनजीच्या किंमती 10 टक्के आणि सीएनजीच्या किंमती7 ते 9 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत गॅस 5 रुपयांनी स्वस्त होऊन सीएनजी 87 रुपयांवरून प्रतिकिलो 79 रुपयांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. तर पीएनजीची किंमत 54 रुपयांवरून 49 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
आतापर्यंत सरकार वर्षातून दोनदा घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेत होते. मात्र नव्या बदलामुळे घरगुती नैसर्गिक वायूची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या जागतिक किमतीच्या मासिक सरासरीच्या 10 टक्के असणार आहे. त्यानुसार दर महिन्याला त्याची माहिती दिली जाणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.