पुणे – ओल्या कचर्यापासून सीएनजी तयार करण्यासाठी सुमारे २०० टन क्षमतेचा प्रकल्प सन २०१७ मध्ये महापालिकेने पाषाण-सूस रस्त्यावर उभारला. पण, आता प्रकल्पाबाबत स्थानिकांकडून तक्रारी वाढत असल्याने हा प्रकल्प स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी आता पीएमआरडीए मालकीच्या नांदे-चांदे गाव हद्दीतील जागेत उभारला जाणार आहे.
ही जागा आठवडाभरात महापालिकेच्या ताब्यात येण्याची शक्यता असून, पुढील तीन महिन्यांत या प्रकल्पाचे स्थलांतर करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठीचा खर्च महापालिकाच उचलणार आहे. सूस रस्त्यावर असलेल्या या प्रकल्प परिसरात लोकवस्ती वाढली असून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे हा प्रकल्प स्थलांतरित करावा, सोसायटींनी या मागणीसाठी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली होती. त्यानंतर लवादाने हा प्रकल्प स्थलांतरित करण्याचे आदेश दिले.
मात्र, महापालिकेने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी सुरू असली तरी,राज्याचे उपमुख्याम्ंत्री अजित पवार, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी वारंवार मागणी केली आहे. तर मागील आठवड्यात या मागणीवरून माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि महापालिकेच्या अधिकार्यांंमध्ये खडाजंगी झाली होती. त्यानंतर अखेर पालिकेने जागा निश्चित करून प्रकल्प स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आली.
…म्हणून नांदे-चांदे गावची निवड
सूस रस्त्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाशेजारीच एक नवीन बांधकाम प्रकल्प उभा राहत आहे. त्यामुळे प्रकल्पाला विरोध होत असल्याने महापालिकेकडून त्याच परिसरात जागा शोधली जात होती. ही जागा नांदे-चांदे गाव हद्दीत असून ती कचरा प्रकल्पासाठी आहे, तसेच तो परिसर बफर झोन आहे. अद्याप या भागात बांधकामे झालेली नसल्याने महापालिकेने विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हा प्रशासनाला हा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार, ही जागा अंतिम करण्यात आली आहे.
त्यामुळे सूस रस्त्यावरील प्रकल्प स्थलांतरित केला जाणार असून, दोन महिन्यांत स्थापत्यविषयक कामे करून त्यानंतर उर्वरित यंत्र सामग्री बसविली जाणार आहे. येथील कचऱ्यापासून स्लरी तयार केली जाते. ती तळेगाव येथील प्रकल्पात पाठवून सीएनजी तयार केला जातो. मात्र, प्रकल्पाच्या ठिकाणी वाहतूक तसेच दुर्गंंधीमुळे त्याला विरोध केला जात आहे.