पुणे – राज्य विद्युत नियामक आयोगाने वीज दरवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र, विजेचे बिल नेमके किती वाढणार, याविषयी ग्राहक संभ्रमात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शंभर युनिट वीज वापरणाऱ्याला 38 रुपये (5 टक्के), 300 युनिट वापरणाऱ्याला 193 रुपये (6.26 टक्के), 500 युनिट वापरणाऱ्याला 428 रुपये (6.8 टक्के) आणि हजार युनिट वापरणाऱ्याला दरमहा नियमित बिलापेक्षा 1,112 रुपये (7.26 टक्के) जास्तीचे बिल येणार आहे.
याबाबत महावितरणने अधिकृत माहिती दिली आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने ऐन उन्हाळ्यात विजेच्या दरात वाढ करीत सर्वसामान्यांना मोठा दणका दिला आहे. घरगुती विजेच्या दरात सहा टक्के वाढ करण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. ही दरवाढ एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात मार्चच्या वीजवापराचे बिल जुन्या दरानेच असेल. मात्र ही दरवाढ दहा टक्के असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे विज बिलात किती दरवाढ होणार आहे, याविषयी गोंधळाची स्थिती आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महावितरणने युनिटच्या वापरावरून विज दरवाढ किती राहणार आहे, याचा लेखाजोखा मांडला. त्यावरून सर्वसामान्यांना किती अधिकचे बिल भरावे लागेल, याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.
69 टक्के ग्राहक कमी वीज वापरणारे
ज्याचा वीजवापर महिन्याला शंभर युनिट आहे, त्यांना 38 रुपये जास्त द्यावे लागतील. अर्थात आता ज्याचा वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे, त्याच्या वीजबिलातील वाढ 38 रुपयांपेक्षा कमी असेल. महत्त्वाचे म्हणजे महावितरणचे 69 टक्के ग्राहक महिना शंभर किंवा त्यापेक्षा कमी युनिट वीज वापरतात. ज्या ग्राहकाचा वीजवापर महिना 300 युनिट आहे, त्यांचे वीज बिल 193 रुपयांनी वाढेल. त्यामुळे वीज कमी वापरणेच फायद्याचे ठरणार आहे.